चंदगड : तिलारी धरण परिसरात पाण्यात बुडालेल्या युवा दंतवैद्याचा मृतदेह रविवारी सकाळी शोध मोहिमेदरम्यान सापडला. विविध यंत्रणा आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही मोहीम यशस्वी करण्यात आली.
आझमनगर परिसरातील काही तरुण शनिवारी तिलारी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यामध्ये व्यवसायाने दंतवैद्य असलेले डॉ. मोहम्मद शेहजान (वय २६) हे पोहण्यासाठी अडक्याचा वझर परिसरात पाण्यात उतरले. मात्र पाण्याची खोली लक्षात न आल्याने ते बुडाल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी संध्याकाळपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र अंधारामुळे ती थांबवावी लागली.
रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी एसडीआरएफ पथक, बेळगाव ग्रामीण पोलीस, वन विभाग तसेच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, मुदस्सर तरनीकर, राजू टक्केकर यांनी संयुक्तपणे प्रयत्न केले. अखेर समन्वित कारवाईतून मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले.








