- तब्बल १० वर्षांनंतर न्याय मिळाला
- शिक्षेचा तपशील आज जाहीर होणार
बेंगळूर : लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने बुधवारी धारवाडचे माजी जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांच्या हत्या प्रकरणात निकाल जाहीर करत आमदार विनय कुलकर्णी यांच्यासह १७ जणांना दोषी ठरवले.
गेल्या १० वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. लोकप्रतिनिधी न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने सर्व दोषींना तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश सीबीआय पोलिसांना दिले आहेत.
दरम्यान, दोषी आमदार विनय कुलकर्णी यांना बेंगळूरमधील परप्पन अग्रहार कारागृह येथे हलवण्यात येणार असून, गुरुवारी शिक्षेची घोषणा केली जाणार आहे.
१५ जून २०१६ रोजी धारवाड येथील सप्तापूर कॉलनीतील ‘उदय जिम’मध्ये योगेश गौडा वर्तमानपत्र वाचत असताना काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोळ्यात मिठाची पूड टाकून प्राणघातक शस्त्रांनी वार करत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात विनय कुलकर्णी यांच्यासह चंद्रशेखर इंडी, बसवराज मुथगी, विनायक काटगी, शिवानंद बागवाडी, संदीप सावदत्ती, महंतेश सिरियन्नवर आणि नवीन मुद्दपूर यांच्यासह एकूण १७ जणांचा समावेश आहे.
योगेश गौडा यांच्या नातेवाईकांनी या निकालानंतर समाधान व्यक्त करत “कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही” असे सांगितले. तसेच या लढ्यात साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले असून, दोषींना जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.








