खानापूर : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील वसतिगृहे आणि निवासी शाळांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तहसीलदारांमार्फत सरकारकडे निवेदन सादर केले. कर्मचाऱ्यांनी सेवेची सुरक्षा, पगारातील विलंब आणि इतर समस्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

कर्नाटक राज्य सरकारी वसतिगृह आणि निवासी शाळा बाह्यस्रोत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खानापूर तहसील कार्यालयाला भेट देऊन मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना उद्देशून निवेदन दिले. गेल्या दोन दशकांपासून स्वयंपाकी, सफाई कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक म्हणून सेवा देत असूनही अद्याप किमान वेतन आणि सेवा सुरक्षितता मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कर्मचाऱ्यांनी मागणी केली की सुट्टीच्या काळातही वेतन नियमित मिळावे तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्यात येऊ नये. त्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचीही मागणी करण्यात आली. सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

जिल्हाध्यक्ष प्रदीप दलवाई आणि जिल्हा महासचिव लक्कप्पा कांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी श्रीकांत सन्नक्की, मल्लप्पा बटमारे, मुबारक नदाफ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.