• जिल्हाधिकाऱ्यांसह ५ अधिकाऱ्यांविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार

बेळगाव / प्रतिनिधी

उत्तर कर्नाटक भागात ट्रॅक्टर व इतर वाहनांवर बसवण्यात येणाऱ्या अनाधिकृत डीजे साऊंड सिस्टीमविरोधात कारवाई न झाल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवासगौड बा. पाटील यांनी थेट कर्नाटक लोकायुक्तांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांसह पाच अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून गेल्या चार महिन्यांपासून प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

डीजे सिस्टीममधून होणाऱ्या तीव्र आवाजामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे. सार्वजनिक ठिकाणी वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे शांततेचा भंग होत असून काही अपघातांनाही या प्रचंड आवाजामुळे कारणीभूत ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनाधिकृत डीजे सिस्टीमवर तातडीने बंदी घालून कठोर पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी लोकायुक्तांकडे केली आहे.