• राज्य रयत संघ आणि हरित सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात फोफावत चाललेल्या बेकायदा दारू विक्रीवर तात्काळ बंदी घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसह कर्नाटक राज्य रयत संघ आणि हरित सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथून निघालेल्या या मोर्चात बहुसंख्य शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संघटनेचे राज्य सरचिटणीस किशन संदी, उपाध्यक्ष शिवानंद मुगळीहाळ आणि जिल्हाध्यक्ष अस्मा जोटदार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, अबकारी व पोलीस खात्याच्या संगनमताने ग्रामीण भागात बेकायदेशीर दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे. या दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असून कुटुंबव्यवस्था आणि तरुण पिढीवर त्याचे गंभीर दुष्परिणाम होत आहेत. पहाटे पाच वाजता मंदिरांचे दरवाजे उघडण्याआधी काही दारू विक्रीची दुकाने सुरू होत असल्याचा आरोपही करण्यात आला.

बेकायदा दारू विक्रीमुळे लहान मुलांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने ठोस कारवाई करावी, अशी जोरदार मागणी यावेळी रयत संघ आणि हरित सेनेतर्फे करण्यात आली.