- श्रीराम सेना हिंदुस्थानचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
देशात महिला व तरुणांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या लैंगिक गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी आणि सामाजिक शोषणाच्या वाढत्या घटनांवर तातडीने आळा घालण्यासाठी संबंधित कायद्यांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्तान, बेळगाव जिल्हा शाखेने केली आहे. यासंदर्भातील निवेदन केंद्रीय व राज्य गृहमंत्र्यांसह बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) येथील एका शाळेत शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याची घटना अलीकडेच उघडकीस आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, लैंगिक गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी आणि सामाजिक शोषण या घटना केवळ स्थानिक स्वरूपाच्या राहिलेल्या नसून, त्या राष्ट्रीय स्तरावर कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न बनल्या आहेत. त्यामुळे भारतीय न्याय संहिता (BNS), लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायदा २०१२ आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक (पॉश) कायदा २०१३ यांची कठोर व प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये कार्यरत अंतर्गत तक्रार समित्या (ICC) अनिवार्य करण्यात याव्यात. पीडितांसाठी गोपनीय आणि सुरक्षित तक्रार यंत्रणा उभारावी. प्राथमिक पुरावे उपलब्ध असलेल्या प्रकरणांत आरोपींना तात्काळ निलंबित करून अटक करावी आणि अशा गुन्ह्यांसाठी जलदगती न्यायालयांची स्थापना करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांच्या परिसरात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री वाढत असल्याने, शैक्षणिक संस्थांचे नियमित ऑडिट करावे व एनडीपीएस कायदा १९८५ ची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासोबतच जिल्हा व राज्य पातळीवर विशेष अंमली पदार्थविरोधी पथके स्थापन करून सतत देखरेख ठेवावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
नाईट पब्समध्ये नियमबाह्य वेळेपर्यंत मद्यपान सुरू राहणे आणि अपुरी देखरेख यामुळे तरुणींच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याचे सांगत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांचे परवाने निलंबित किंवा रद्द करावेत. सीसीटीव्ही देखरेख, महिला सुरक्षा कर्मचारी आणि पोलिस पडताळणी सक्तीची करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रमाकांत कोंडुसकर आणि बेळगाव तालुकाप्रमुख भरत पाटील यांनी प्रशासनाने या मागण्यांची तातडीने पूर्तता करून कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








