- अभाविप प्रदेशाध्यक्ष कांताकुमार यांची टीका
- शांततापूर्ण निदर्शनांना परवानगी नाकारल्याने व्यक्त केली नाराजी
बेळगाव / प्रतिनिधी
राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून विद्यार्थ्यांप्रती बेजबाबदारपणा दाखवत आहे, अशी टीका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष कांताकुमार यांनी केली. शांततापूर्ण निदर्शने करण्यास सरकारने नकार दिल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कांताकुमार म्हणाले की, “सरकारने सभागृहात आमच्या मागण्यांवर त्वरित प्रतिसाद द्यायला हवा होता.” राज्यातील विविध विभागांत ४३ शाखांमध्ये तब्बल २,७५,३८६ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची मागणी अभाविपकडून सातत्याने होत आहे. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवण्याबाबत चर्चा होऊन परवानगीसाठी सरकारकडे अर्जही सादर करण्यात आला, तरीही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, अशी तक्रार त्यांनी केली.
निदर्शनाला परवानगी नाकारल्याबाबत कांताकुमार म्हणाले की, “संवैधानिकरित्या निदर्शने करणे हा आमचा अधिकार आहे. इतर सर्व निदर्शनांना परवानगी देणारे सरकार आम्हालाच का नकार देते?”
धारवाड, बेंगळुरू आणि विजयपूर येथे निदर्शने पार पडूनही ‘कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल’ या कारणावरून फक्त बेळगावमधील निदर्शनांना परवानगी नाकारण्यात आली. “तर काय, कायदा-सुव्यवस्था फक्त बेळगावातच बिघडणार आहे?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सरकारकडून नकार मिळाल्यानंतर कांताकुमार यांनी स्पष्ट केले की, ते आता न्यायालयाकडे धाव घेऊन परवानगी मिळवतील आणि निदर्शने बेळगावमध्येच होतील. “आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास असून आम्ही विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच ठेवू,” असे ते म्हणाले.








