• बेळगाव पश्चिम ग्रामीण भागातील १७ माध्यमिक शाळांचा सहभाग

बिजगर्णी : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत आयोजित बेळगुंदी झोनल माध्यमिक शालेय क्रीडा स्पर्धांना उद्यापासून बिजगर्णी हायस्कूलच्या क्रीडांगणावर प्रारंभ होत असून, स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रथमच बेळगुंदी आणि हिंडलगा क्लस्टर एकत्रितपणे या स्पर्धेत सहभागी होत असून, पश्चिम ग्रामीण भागातील १७ माध्यमिक शाळांतील सुमारे ५०० खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत आपले कौशल्य दाखविणार आहेत.

स्पर्धेत १४ व १७ वर्षांखालील मुला-मुलींसाठी कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल या सांघिक स्पर्धांसह धावणे, लांब उडी, उंच उडी, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक आदी वैयक्तिक स्पर्धा रंगणार आहेत. सहभागी खेळाडूंनी स्पर्धेसाठी पूर्ण तयारी केली असून, मैदानावर चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.

यंदा स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी बिजगर्णी हायस्कूलकडे असल्याने मैदानांची उभारणी, खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा आणि इतर सर्व व्यवस्थांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उत्साहाने कार्यरत आहेत.

मुख्याध्यापक रमेश कांबळे आणि क्रीडा शिक्षक ए. एम. दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्रीडा प्रकारांसाठी मैदानांची तयारी पूर्ण झाली असून, उद्याच्या उद्घाटनासह चार दिवस क्रीडामय वातावरण अनुभवायला मिळणार आहे.