येळ्ळूर : येथील कलमेश्वर, चांगळेश्वरीदेवी यात्रोत्सव व महालक्ष्मीदेवी वाढदिवसानिमित्त आज गुरुवारी येळळूर महाराष्ट्र मैदानात आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाला मोठा उत्साहात प्रारंभ झाला. माजी आमदार परशुराम भाऊ नंदीहळ्ळी यांच्याहस्ते आखाड्याचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष प्रमोद पाटील, अध्यक्ष अजित गोरल, प्रदीप देसाई, भोला पाखरे, राजू पावले, मोहन कुजी, दुदाप्पा बागेवाडी, हणमंत पाटील, सतिश कुगजी, यलुप्पा पाटील, विलास नंदी, तानाजी हलगेकर, पिंटु चौगले, मधु मुचंडी, राजु डोण्याण्णावर, परशराम घाडी, राहुल कुगजी, मधु पाटील, नंदू पाटील, नारायण कंग्राळकर, श्रीधर कानशिडे यांच्यासह कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

उतम दर्जाचा आखाडा तयार केला आहे. प्रेक्षकांना बसण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मल्ल मिर्झा इराण वि. हिंदकेसरी साहिल कोहली पंजाब यांच्यात प्रथम क्रमाकांची कुस्ती होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची लढत डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध सोनीपत हरियाणाचा मल्ल निरु गुर्जर यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची लढत महाराष्ट्रकेसरी पृथ्वीराज पाटील व पंजाब केसरी मुसा पंजाब यांच्यात, चौथ्या क्रमांकाची लढत राहुल सुळ पुणे वि. राघू ठोंबरे कोल्हापूर, पाचव्या क्रमांकाची लढत हितू ठाकूर मथुरा व महाराष्ट्र चॅम्पियन सुबोध पाटील यांच्यात होणार आहे. सहावी कुस्ती बाळू अपराध वि. अनुजकुमार दिल्ली, सातवी कुस्ती शिवा दड्डी वि. उदयकुमार दिल्ली अशा कुस्त्या रंगणार आहेत. नवहिंद कुमार केसरीसाठी प्रथमेश हट्टीकर व अक्षय तांबे शाहुपुरी यांच्यात लढत होणार आहे.  या मैदानात दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, सांगली, कोल्हापूर, पुणे, कर्नाटक परिसरातील मल्लांच्या चटकदार कुस्त्या होणार आहेत.