- एस.डी.एम.सी.च्या वतीने समारंभाचे आयोजन
येळ्ळूर : मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूरच्या शिक्षिका सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्या एस.डी.एम.सी.च्या वतीने शनिवारी सकाळी त्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.
शाळेच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात प्रार्थनेच्या वेळी झालेल्या या कार्यक्रमात एस.डी.एम.सी.च्या सदस्यांनी सौ. शोभा निलजकर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविले. यावेळी एस.डी.एम.सी.चे उपाध्यक्ष श्री. जोतिबा यल्लाप्पा उडकेकर यांनी निलजकर यांनी शाळेच्या विकासासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
शाळेच्या सुधारणा आणि विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून, गेल्या चार वर्षांपासून प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून कर्नाटक सरकारकडून त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला असल्याचे उडकेकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी निलजकर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
- पुरस्काराबद्दल कृतज्ञता : शोभा निलजकर यांची शाळेसाठी १.२१ लाखांची देणगी
सत्काराला उत्तर देताना सौ. शोभा राजाराम निलजकर यांनी मिळालेला पुरस्कार हा केवळ आपला नसून आपल्या संपूर्ण शाळेचा सन्मान असल्याचे सांगितले. हा पुरस्कार मिळविण्यासाठी केलेल्या कार्यात शाळेच्या आजी-माजी एस.डी.एम.सी. सदस्यांचे, मुख्याध्यापकांचे आणि शिक्षकांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद करत सर्वांचे आभार मानले.
दरम्यान, शाळेत वापरण्यासाठी पाण्याची कमतरता भासत असल्याची बाब लक्षात घेऊन निलजकर यांनी शाळेच्या आवारात विहीर खोदणे तसेच त्यातील पाणी खेचण्यासाठी मोटार, पाइपलाईन आणि सिंटेक्स टाकी बसविण्यासाठी येणाऱ्या खर्चाकरिता १ लाख २१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाला शाळेच्या एस.डी.एम.सी. अध्यक्षा सौ. दिव्या कुंडेकर, वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. राजेंद्र चलवादी, उपाध्यक्ष श्री. जोतिबा उडकेकर, सदस्य श्री. मुर्तिकुमार माने, श्री. चांगदेव मुरकुटे, श्री. दिनेश लोहार, श्री. मारुती यळगुकर, सदस्या सौ. अर्चना देसाई, सौ. ज्योती पाटील, सौ. प्रियंका सांबरेकर यांच्यासह शाळेचे शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.








