बेळगाव : बेळगाव येथील केळकर बाग परिसरातील व्यापारी संघटनेतर्फे आज पोलीस आयुक्त कार्यालयात मा. उपपोलीस आयुक्त नारायण भारमनी यांना निवेदन देण्यात आले.
गणेशोत्सवाच्या काळात ग्रामीण तसेच शहर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रात्री १० वाजल्यानंतर खरेदीसाठी बाजारपेठेत येतात. मात्र काही ठिकाणी पोलिसांकडून दुकाने लवकर बंद करण्याच्या सूचना दिल्या जात असल्याने व्यापाऱ्यांना तसेच ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.व्यापारी वर्गाच्या या मागणीचा सकारात्मक विचार करून गणेशोत्सवाच्या काळात रात्री १२ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली.
यावेळी भाजपा नेते धनंजय जाधव प्रसाद मोरे प्रेम चिखलकर तसेच केळकर बाग परिसरातील व शहरातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या काळात व्यापारी व ग्राहकांना दिलासा देणारा हा निर्णय ठरला आहे.







