बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक गोवंश हत्या प्रतिबंधक आणि संरक्षण कायद्यात करण्यात येत असलेल्या दुरुस्तीच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज चन्नम्मा सर्कल येथे जोरदार निदर्शने केली. ही दुरुस्ती राज्याच्या हिताविरुद्ध असून ती विधानसभेत मांडू नये, अशी मागणी आंदोलकांनी केली.

राज्य सरकारने अलीकडील मंत्रिमंडळ बैठकीत कर्नाटक गोवंश हत्या प्रतिबंधक आणि संरक्षण कायदा, २०२० मधील कलम ६(४) मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय लवकर मंजूर न केल्याबद्दल सरकारची कार्यशैली संशयास्पद असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.
यावेळी बोलताना जैन समाजाचे सचिव राजेंद्र जैन म्हणाले, “गायींची हिंसक वाहतूक करणाऱ्यांवर योग्य कारवाई होत नाही. वाहने पकडली तरी आरोपींना २४ तासांत सोडले जाते. हे कोणते प्रशासन? गाय आपली माता आहे, तिच्या सुरक्षेविरुद्ध जाणे कसे योग्य?” असे ते म्हणाले. त्यांनी सरकारवर निष्क्रीयतेचा आरोप करत, ‘अशा विनाशकारी निर्णयांपासून दूर राहा,’ अशी टीका केली.
दुसऱ्या एका हिंदू संघटनेच्या नेत्याने सांगितले की, २०२० मध्ये लागू केलेल्या गोहत्या बंदी कायद्याने गायींच्या हिंसक वाहतुकीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. परंतु, आता या कायद्यात सुधारणा करण्याची तयारी केली जात असल्याने हिंदू समाजात तीव्र नाराजी आहे. “हा कायदा मागे घेण्यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरणे आवश्यक आहे,” अशी घोषणा त्यांनी केली.
निवेदनात म्हटले आहे की, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेक ठिकाणी अजूनही पैशाच्या हव्यासापोटी गायींची क्रूर वाहतूक केली जात आहे.
आंदोलनात प्रमोद वकुंदमठ, स्वरूप कालकुंद्रीकर, आनंद करलिंगन्नावर, नागेश कांबळे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.








