अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बांसवाडा येथील डॉक्टर दाम्पत्याचे संपूर्ण कुटुंब विमान अपघातात मृत्युमुखी पडले. अपघातापूर्वी, डॉ. प्रतीक जोशी त्यांच्या पत्नी डॉ. कोनी आणि तीन मुलांसह एकाच विमानाने लंडनला जात होते, मात्र हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला.
विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या डॉ. कोनी व्यास उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या. त्या प्रद्युत जोशी, मिराया जोशी आणि नकुल जोशी या आपल्या मुलांसह राहत होत्या. तर डॉ. कोनी यांचे पती प्रतीक जोशी लंडनमध्ये डॉक्टर होते. या काळात डॉ. कोनी यांनाही त्यांच्या पतीसोबत लंडनला शिफ्ट व्हायचे होते. यामुळे त्यांनी गेल्या महिन्यात रुग्णालयातून राजीनामा दिला. दरम्यान, गुरुवारी, त्या अपघातग्रस्त विमानात चढल्या आणि पती प्रतीक आणि तीन मुलांसह लंडनला रवाना होणार होत्या, परंतु या दुर्दैवी घटनेत संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला.
- बेळगावमध्ये घेतले होते एमबीबीएसचे शिक्षण :
दरम्यान प्राप्त माहितीनुसार डॉ. प्रतीक जोशी यांनी २००० ते २००५ पर्यंत बेळगावमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते. ते सध्या राजस्थानमधील बाणवल येथील रहिवासी होते. त्यांनी सप्टेंबरमध्ये बेळगावला येण्याची योजना आखली होती आणि त्यांच्या जवळच्या मित्रांना सांगितले होते की ते त्यावेळी येतील. पण विमान अपघातात त्यांचेही निधन झाले आहे.
- फ्लाईटमध्ये काढलेला सेल्फी हा शेवटचा फोटो ठरला :
त्यांची मुलेही वडिलांसोबत फ्लाईटमध्ये जाताना खूप आनंदी दिसत होती. अपघातापूर्वी डॉ. प्रतीक जोशी आणि कोनी जोशी यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सेल्फी काढला, जो त्यांच्या आयुष्यातील शेवटचा फोटो ठरला. येथे अपघातानंतर डॉ. प्रतीक आणि कोनी यांच्या कुटुंबात गोंधळ उडाला.