• सीईओ राहुल शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
  • जि. पं. कार्यालयात व्हीबी-जी रामजी योजनेची प्रगती आढावा बैठक

बेळगाव : विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत मजुरांना सातत्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने तातडीने कामे हाती घ्यावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोमवारी जिल्हा पंचायत कार्यालयात व्हीबी-जी रामजी योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते.

यावेळी राहुल शिंदे यांनी सांगितले की, सध्या अपुऱ्या पावसामुळे ग्रामीण भागात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत मंजूर कामे उपलब्ध नसल्यास किमान पाच कामांचा कृती आराखडा तयार करून तातडीने जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी सादर करावा. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून मजुरांना सातत्यपूर्ण रोजगार मिळेल, याची दक्षता घ्यावी.

दुष्काळ व्यवस्थापनाशी संबंधित कामांना प्रथम प्राधान्य देण्याचे निर्देश देताना त्यांनी जलसंधारण, कायमस्वरूपी उपजीविका निर्माण करणारी कामे आणि ग्रामीण विकासाला चालना देणारे उपक्रम राबविण्यावर भर दिला. तसेच या योजनेची माहिती ग्रामीण नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती कार्यक्रमही आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

व्हीबी-जी रामजी योजनेअंतर्गत जलसंधारण, ग्रामीण पायाभूत सुविधा, उपजीविका विकास आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित एकूण ३१८ प्रकारची कामे हाती घेता येतात. या संधीचा प्रभावी वापर करून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध कामे राबवावीत, असेही त्यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाला ग्रामीण भागातील गोठ्यांची ओळख करून जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देतानाच वन, कृषी, उद्यान, शिक्षण, महिला व बालविकास, आरोग्य आणि इतर विभागांनीही आपल्या योजनांचा समन्वय साधून रोजगारनिर्मितीला चालना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीला जिल्हा जिल्हा पंचायतीचे नियोजन संचालक रवी बंगारप्पनवार, कृषी विभागाचे सहसंचालक एच. डी. कोलकर, उद्यान विभागाचे सहसंचालक महांतेश मुरागोडा, महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक चेथनाकुमार, डीडीपीआय लीलावती हिरेमठ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ईश्वरा गडाडा, डीएफओ राजेश्वरी एरनट्टी तसेच विविध विभागांचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.