• नागरिकांच्या आरोग्याला धोका

बेळगाव : टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपोमधील जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) कार्यालयाच्या परिसरातील झुडपांमध्ये धोकादायक वैद्यकीय कचरा आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचे ढीग टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळा सुरू झाल्याने हा कचरा पावसाच्या पाण्यासोबत वाहून रस्त्यांवर पसरण्याची शक्यता असून, त्यामुळे नागरिकांसह परिसरात खेळणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणारी महापालिका, सरकारी कार्यालयांच्या परिसरात साचलेल्या या कचऱ्याबाबत कोणती भूमिका घेणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी या संदर्भातील व्हिडिओ पुराव्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, संबंधित कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावावी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) कार्यालयाने स्वच्छतेबाबत आदर्श निर्माण करावा, अशी मागणी केली आहे.

वेळेत योग्य ती कारवाई न झाल्यास भविष्यात हा परिसर साथीच्या रोगांचे केंद्र ठरू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.