विजयपूर / दिपक शिंत्रे
सायक्लोनच्या प्रभावामुळे विजयपूर जिल्ह्यात आणि गेल्या चार-पाच दिवसांपासून कृष्णा नदीच्या पात्र क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे उत्तर कर्नाटकाची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीवरील आलमट्टी जलाशयात यंदाच्या मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच पहिला विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आलमट्टीच्या लालबहादूर शास्त्री जलाशयात यंदाच्या वर्षीचा पहिला विसर्ग १९ मे सोमवार रोजी नोंदवण्यात आला. त्या दिवशी ४२४ क्युसेक्स पाणी जलाशयात आले. २० मे मंगळवार रोजी ३८२ क्युसेक्स, बुधवारी आणि गुरुवारी प्रत्येकी १७२२ क्युसेक्स, तर शुक्रवारी १६७९ क्युसेक्स पाणी आले. या सहा दिवसांत एकूण ५९२९ क्युसेक्स पाणी जलाशयात आले आहे. ही अलीकडील वर्षांतील सर्वात लवकर झालेली पाण्याची आवक आहे. दरवर्षी ही आवक जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होत असे. यंदा मे महिन्याच्या अखेरीसच मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून, त्यामुळे चांगल्या पावसाचीही आशा निर्माण झाली आहे. सध्या आलमट्टी धरण परिसरात कृष्णानदी क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने विसर्ग सुरू आहे. मात्र, अजून बेळगाव व महाराष्ट्रातून पाणी आलेले नाही. ही सध्या तात्पुरती आवक असून, पाऊस थांबताच ती थांबेल, असे केबीजेएनएलच्या विभागाचे मुख्य अभियंता डी. बसवराज यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील धरणे अजून भरलेली नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली.