
सुळगा (हिं.) / वार्ताहर
“टाळ वाजे… मृदंग वाजे… वाजे हरीची वीणा”… “माऊली – तुकोबा” निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा”…
आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध राज्यातील कानाकोपऱ्यातून वारकरी दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रतिवर्षीप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या उस्ते सत्तरी, वाळपई गोवा येथील श्रीराम माऊली वारकरी मंडळाच्या पायी दिंडीचे आज गुरुवार दि. २६ जून रोजी सुळगा (हिं.) येथे आगमन होताच उत्साहात स्वागत करण्यात आले.
स्वागतासाठी दिवंगत ग्रा. पं. सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते शट्टुप्पा उर्फ शेंदूर बाळू पाटील यांचे कुटुंब तसेच समाजसेविका माधुरी जाधव पाटील आणि सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. यानिमित्ताने बेळगाव – वेंगुर्ला मार्गावरील हनुमान मंदिर परिसरात वारकऱ्यांच्या अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.
प्रारंभी दिवंगत शट्टूप्पा उर्फ शेंदूर बाळू पाटील यांचे सुपुत्र रोहन आणि समाजसेविका माधुरी जाधव यांनी दिंडीचे स्वागत केले. यावेळी वारकऱ्यांच्या वतीने दिवंगत शट्टूप्पा उर्फ शेंदूर बाळू यांना मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यानंतर वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने काहीशी उसंत घेतल्याने मोकळ्या वातावरणात वारकऱ्यांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला.
यावेळी वारकरी रामकृष्ण पांडुरंग इब्राहमपूरकर यांनी मंडळाच्या पायी वारीबद्दल माहिती देऊन वारीचे अध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले. तसेच वारीचे स्वागत करून दाखवलेल्या आपुलकीबद्दल त्यांनी आभार मानले. तर समाजसेविका माधुरी जाधव यांनी वारीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी लाभल्याने समाधान व्यक्त केले. तसेच दिंडीतील वारकऱ्यांच्या रूपात साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी दरवर्षीप्रमाणे दिंडीचे स्वागत करून अल्पोपहाराची व्यवस्था केल्याबद्दल दिंडीच्यावतीने रोहन शट्टूप्पा पाटील यांचा तसेच उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल समाजसेविका माधुरी जाधव यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी श्वेता खांडेकर, रोहन निलजकर, रोहित निलजकर, साईनाथ पाटील, मंथन बोकडे, प्रज्वल पाटील, प्रकाश पाटील, ओंकार पाटील, चेतन पाटील, सतीश चौगुले, सूरज चौगुले, मयूर बोकडे, रमेश अधिकारी, बाबू कोकीतकर, रमेश कलखांबकर, खेमानी कलखांबकर आदी उपस्थित होते. यानंतर दिंडी पंढरपूरच्या दिशेने पुढे रवाना झाली.
