बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाला वेग देण्यासाठी आणि नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी येत्या एका आठवड्यात जाहीर सभा आयोजित केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आज विभागस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, उड्डाणपुलाचे काम पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग, सम्राट अशोक रोड, मध्यवर्ती बसस्थानक, आरटीओ सर्कल ते चन्नम्मा सर्कल या मार्गावर राबवले जाणार आहे. जाहीर सभेत नागरिकांच्या सूचनांवर चर्चा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली टेंडर प्रक्रिया सुरू केली जाईल.
यावेळी त्यांनी सवदत्ती येथील यल्लम्मा डोंगर विकास प्रकल्पासाठी २१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. या विकासकामांचा शुभारंभ १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत ११६ कोटी रुपयांची भरपाई वितरित करण्यात आली आहे. तसेच पावसात पूर्णतः घर कोसळलेल्या प्रसाद माळी यांना नव्या घराच्या बांधकामासाठी ५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. पायाभरणीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना महानगरपालिकेकडून देण्यात आल्या असून, पुढील टप्प्यातील अनुदान लवकरच दिले जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
ही बैठक विविध शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.








