- दोन्ही दरवाजे ७ इंचाने उघडल्याने मार्कंडेय नदीला पुराचा धोका
तुडये / वार्ताहर
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दुपारपासून संततधार पावसाने दमदार हजेरी लावली. गुरुवारी सायंकाळी २४७३.५० फूट पाण्याची पातळी स्थिर राहिल्याने शुक्रवारी सकाळी जलाशयाची पाणीपातळी २४७३.५० फूट इतकी नोंद झाली. पाणीपातळी कमी करण्यासाठी सकाळी वेस्टवेअरचे दोन आणि पाच क्रमांकाचे दोन दरवाजे तीन इंचाने उघडण्यात आले.
दुपारी १ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला. पाणीपातळी २४७३.७० पर्यंत वाढल्याने सायंकाळी सात वाजता दोन्ही दरवाजे ७ इंचाने उघडल्याने पाण्याचा प्रचंड विसर्ग मार्कडेय नदीतून वाहू लागल्याने नंदीला पुराचा संभाव्य धोका उद्भवणार आहे.
शुक्रवारी सकाळी ३५.१ मि.मी. व एकूण १३६५.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जलाशयाची पूर्ण क्षमता ही २४७५ फूट आहे. ती पूर्ण करण्यास अजूनही फूटभर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र जलाशयाकडील दोन दरवाजे उघडल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने पाणीपातळीही स्थिर आहे. जलाशयाने आपली पातळी शुक्रवारी पूर्ण केली असती. जलाशयाकडे येणाऱ्या पाण्याचा ओघ आणि वाढणारी पाणीपातळी यावर जलाशय व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे. आणखी दरवाजे उघडण्याच्या तयारीत आहेत.
- विसर्ग :
- मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने पाणीपातळी स्थिर
- वाढणाऱ्या पाणी पातळीवर जलाशय व्यवस्थापनाचे लक्ष