- दोन महिन्यांत ७० टक्के कचरा हलवणार
- मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची ग्वाही
बेळगाव : शहरातील तुरमुरी कचरा डेपो आणि हलगा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट करत, संबंधित प्रश्न दोन महिन्यांत मार्गी लागतील अशी ग्वाही दिली. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच सर्व विकासकामे पूर्ण केली जातील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, तुरमुरी येथील कचरा व्यवस्थापन समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासन आणि महापालिकेने नियोजनबद्ध पावले उचलली आहेत. शहराच्या उत्तर, दक्षिण तसेच यमकनमर्डी भागात कचरा डेपो उभारण्यासाठी आवश्यक जमिनीची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या दोन महिन्यांत तुरमुरीतील सुमारे ७० टक्के कचरा अन्य ठिकाणी स्थलांतरित केला जाईल. हलगा येथील एसटीपी प्रकल्पाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, मागील सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति एकर ३ लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली होती. मात्र, सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ही भरपाई तब्बल ५० लाख रुपये प्रति एकर इतकी वाढवली आहे. लवकरच या प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बेळगुंदी परिसरातील अवैध खाणकामाच्या मुद्द्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या असून, अवैध खाणकामात गुंतलेल्या कोणत्याही व्यक्तीला वाचवले जाणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.








