बेळगाव : तिलारी घाटातून आता वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असून मालवाहू अवजड वाहने या मार्गांवरून जात असतात. शनिवारी सकाळी तिलारी घाटात एका वळणावर कंटेनर अडकल्याने दोन्ही बाजूना वाहनांची रांग लागली होती. त्यामुळे सुमारे दोन तासाहून अधिक काळ वाहतूकीची कोंडी झाली.
वाहतूकीचे नियोजन करताना पोलिसांचीही दमछाक झाली. अखेर जेसीबीच्या साहाय्याने कंटेनर बाजूला काढण्यात आला. नंतर दोन्ही बाजूची वाहतूक खुली करण्यात आली.
आंबोली आणि चोर्लामार्गे अवजड वाहनांना सोडले जात नाही. त्यामुळे दहा टनाच्या वरील वाहतूक करणारी वाहने तिलारी मार्गे गोव्यात ये – जा करत असतात. त्यामुळे वारंवार तिलारी घाटात उद्भवणारी वाहतूक समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.








