• केंद्र सरकारच्या विधेयकाविरोधात बेळगावात निदर्शने ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
  • ‘नामांतर नव्हे, रोजगाराच्या हक्कावर घाला’ – शेतकरी संघटनांचा आरोप

बेळगाव / प्रतिनिधी

ग्रामीण भागातील गरीब व शेतमजुरांसाठी आधारस्तंभ ठरलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) मधून महात्मा गांधीजींचे नाव हटवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाविरोधात सोमवारी बेळगावात भारतीय कृषक समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने हिवाळी अधिवेशनात मनरेगा योजनेत बदल सुचवणारे विधेयक मांडल्याने शेतकरी व मजूर संघटनांमध्ये असंतोष पसरला आहे. भारतीय कृषक समाज (संयुक्त) आणि नरेगा सहभाग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी म्हणाले की, “मनरेगा ही केवळ योजना नसून ग्रामीण भारतातील गरिबांच्या रोजगाराचा हक्क आहे. या योजनेतून महात्मा गांधीजींचे नाव काढणे हे केवळ नामांतर नसून, हळूहळू योजना कमजोर करून बंद करण्याचा डाव आहे.” मनरेगाचे मूळ नाव कायम ठेवावे, मजुरांचे वेतन वाढवावे आणि कामाचे दिवस अधिक करावेत, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

ग्रामीण जनतेच्या हिताच्या या योजनेत कोणताही बदल न करता ती अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचा सूर आंदोलकांनी यावेळी लावला. या आंदोलनात शेतकरी कार्यकर्ते, मजूर आणि नरेगा संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.