बेळगाव : बेळगावसह राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बिले न मिळाल्याच्या निषेधार्थ भारतीय कृषिक समाजाच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ऊस पुरवठा करूनही दीर्घकाळ पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नियमांनुसार ऊस दिल्यानंतर १५ दिवसांत शेतकऱ्यांना देयके मिळणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात अनेक कारखाने महिनोनमहिने पैसे थकवून ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला. हक्काच्या पैशांसाठी शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
साखर कारखान्यांनी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार पूर्ण पैसे देणे बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी अपूर्ण देयके दिली जात असल्याची तक्रार करण्यात आली. ऊस लागवडीसाठी मोठा खर्च येत असून, वेळेवर पैसे न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत. राज्यभरात हजारो कोटी रुपयांची बिले प्रलंबित असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले.
हक्काचे पैसे आणि योग्य दर न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मुदकण्णा कंकणवाडी यांनी दिला. तसेच, कारखानदारांवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका करण्यात आली.
दरम्यान, महांतेश कामत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “शेतकऱ्यांचे पैसे वेळेत न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आणि साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला.”
या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी आणि भारतीय कृषिक समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.








