- शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बेळगाव / प्रतिनिधी
शहरातील ‘जय किसान’ खाजगी भाजी मार्केटचे ट्रेडिंग लायसन्स एपीएमसी संचालकांनी रद्द केल्याने, हे मार्केट जिल्हा प्रशासनाने ताब्यात घ्यावे, अशी जोरदार मागणी करत शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
यावेळी विविध शेतकरी समर्थक संघटनांचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, अनधिकृत ‘जय किसान’ भाजी मार्केट तात्काळ सरकारी ताब्यात घेण्याची मागणी केली.

गेल्या तीन वर्षांपासून बेळगावमधील सरकारी एपीएमसी मार्केटचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी हितचिंतक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने लढा दिला आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे सरकारला वास्तवाची जाणीव झाली आहे. परिणामी कृषी विभागाच्या बाजार संचालकांनी बेळगावातील खाजगी ‘जय किसान’ मार्केटची परवानगी रद्द केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांनी तात्काळ हे अनधिकृत मार्केट ताब्यात घेऊन शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट एपीएमसीमध्ये पाठवावा, अशी मागणी करण्यात आली. ‘जय किसान’ मार्केटमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी कधीच मिळाली नाही. आता बाजार एपीएमसीकडे वळविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना आपले प्रश्न मांडता येतील, असे शेतकरी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. जर हे मार्केट तातडीने ताब्यात घेतले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय कृषी समाजाचे नेते सिद्धगौडा मोदगी यांनी दिला.
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते चुनाप्पा पुजारी, सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद, ॲड. नितीन बोलबंडी यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.