- विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ; येळ्ळूर किल्ल्यापर्यंत २० किलोमीटरचा सायकल प्रवास
बेळगाव : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देण्यासाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या वतीने बेळगावात ‘तिरंगा ऑन व्हील्स’ सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. भारतीय लष्कराच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात विविध शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरपासून सुरू झालेली सुमारे २० किलोमीटरची रॅली येळ्ळूर किल्ल्यापर्यंत काढण्यात आली. बेळगाव स्टेशन कमांडर तथा द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः सायकल चालवत तरुण सायकलस्वारांसोबत सहभाग घेतला.

राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक २ आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड स्कूलमधील विद्यार्थी व शिक्षक रॅलीत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे अधिकारी, जेसीओ आणि जवानांनीही विद्यार्थ्यांसोबत सायकल रॅलीत सहभाग घेतला. त्यामुळे भारतीय लष्कर, शैक्षणिक संस्था आणि नागरिक यांच्यातील सहभागाचे दर्शन घडले.
‘तिरंगा ऑन व्हील्स’च्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला तरुणाईच्या जोशाची जोड मिळाली. देशभक्तीसोबतच आरोग्य, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला.








