कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपाला मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर सुवेंदू अधिकारी यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असून, ते राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे.

कोलकाता येथील बिस्वा बांगला कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भाजपाच्या पश्चिम बंगाल कार्यकारिणी आणि नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य उपस्थित होते. बैठकीत सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, “निवडणुका संपल्या असून पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. सर्व आमदार आणि नेत्यांनी सुवेंदू अधिकारी यांचेच नाव पुढे केले. दुसरे कोणतेही नाव समोर आले नाही. त्यामुळे सुवेंदू अधिकारी हेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असतील.”

५५ वर्षीय सुवेंदू अधिकारी यांनी २०२१ मध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पुन्हा पराभव केला.

  • सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवास :

सुवेंदू अधिकारी यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. १९९५ मध्ये ते प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९८ मध्ये ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केल्यानंतर ते पक्षात दाखल झाले.

२००६ मध्ये ते कांथी दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले. नंदीग्राम आणि सिंगूर येथील जमीन अधिग्रहणविरोधी आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ‘भूमी उच्छेद प्रतिरोध समिती’चे नेतृत्व करत त्यांनी आंदोलन उभारले. या आंदोलनामुळे पश्चिम बंगालमधील डाव्या आघाडीची ३४ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आणि २०११ मध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री बनल्या.