• पोलीस प्रशासनाचा आदेश

बेळगाव : कपिलेश्वर मंदिरालगत असलेल्या कपिलनाथ विहिरीजवळ वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने या परिसरात सर्वसामान्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. ३ मे रोजी विहिरीच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळून दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने ही कठोर कारवाई केली आहे.

अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत मनाई आदेश जारी केले आहेत. हा आदेश ८ मे २०२६ पासून लागू झाला असून पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार आहे.

कपिलनाथ विहीर ही शेकडो वर्षे जुनी असून तिच्या संरक्षक भिंती अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. परिसरात पुरेशा सुरक्षाव्यवस्थेचा अभाव असल्याने येथे गंभीर धोका निर्माण झाला आहे. तरीदेखील अनेक नागरिक आणि मुले पोहण्यासाठी व विरंगुळ्यासाठी या ठिकाणी येत असल्याचे समोर आले आहे.

खडेबाजार पोलीस ठाण्याच्या नोंदीनुसार, २०१३ ते २०२६ या कालावधीत या विहिरीत पडून १६ जणांचा मृत्यू झाला असून किमान १४ दुर्घटनांची नोंद झाली आहे.

या पार्श्वभूमीवर कपिलनाथ विहिरीचा परिसर ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित अधिकृत कर्मचारी वगळता इतर सर्व नागरिकांना परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पोहणे, जलक्रीडा किंवा इतर मनोरंजनात्मक उपक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, कपिलेश्वर मंदिरातील धार्मिक विधींना या आदेशातून सूट देण्यात आली असून नागरिकांना सतर्क करण्यासाठी परिसरात धोक्याचे सूचना फलक तातडीने लावण्याचे निर्देश खडेबाजार पोलिसांना देण्यात आले आहेत.