- व्यवस्था, सुरक्षा आणि पारदर्शकतेवर भर
- विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
राज्यभर आजपासून सुरू झालेल्या दहावीच्या मुख्य परीक्षेच्या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शहरातील विविध परीक्षा केंद्रांना भेट देत व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. कर्नाटक शालेय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने आयोजित या परीक्षेसाठी सर्व सुविधा सुरळीत असल्याची खात्री त्यांनी करून घेतली.
परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा सखोल आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली पारदर्शकपणे पार पाडावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कोणत्याही प्रकारचा ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होत असून, पहिला पेपर शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.








