- जिल्ह्यात ३६.३५ लाख मतदारांची नोंद
- बेळगाव उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण मतदारसंघांत मिळून ६.३५ लाख मतदार
बेळगाव : कर्नाटकातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेला जिल्हा म्हणून बेळगावने राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR 2026) प्रक्रियेनंतर २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत बेळगाव जिल्ह्यात एकूण ३६ लाख ३५ हजार ८६० मतदारांची नोंद झाली आहे. राज्यातील ३४ निवडणूक जिल्ह्यांमध्ये बेळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी, कर्नाटक यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात १८ लाख २५ हजार ५३१ पुरुष, १८ लाख १० हजार १७० महिला आणि तृतीयपंथी प्रवर्गातील १५९ मतदार आहेत. पुरुष आणि महिला मतदारांची संख्या जवळपास समान असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
- विशेष पुनरीक्षणानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध :
विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करणे, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारणे आणि निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडून संबंधित प्रकरणांची पडताळणी करणे, असे विविध टप्पे पूर्ण करण्यात आले. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.
नागरिकांनी अंतिम मतदार यादीत आपले नाव, वैयक्तिक तपशील, मतदान केंद्र आणि मतदार यादीतील अनुक्रमांक तपासून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- निर्णयाविरोधात अपील करण्याची संधी :
मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे बाधित झालेल्या नागरिकांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २४ नुसार निर्धारित कालमर्यादेत अपील करता येते. पहिल्या अपिलासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे, तर लागू तरतुदींनुसार दुसऱ्या अपिलासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद मागता येते. मतदार नोंदणीसंदर्भातील माहिती आणि मदतीसाठी नागरिकांना निवडणूक आयोगाच्या १९५० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल.
- मतदार ओळखपत्र आहे, म्हणजे यादीत नाव आहेच असे नाही !
केवळ मतदार ओळखपत्र (Voter ID) जवळ असल्याने संबंधित व्यक्तीचे नाव सध्याच्या मतदार यादीत असल्याची खात्री होत नाही. त्यामुळे प्रत्येक मतदाराने अंतिम यादीत आपले नाव आणि मतदान केंद्राची माहिती तपासणे महत्त्वाचे आहे.
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येतो. तसेच मतदारांच्या नोंदींमध्ये काही त्रुटी आढळल्यास निर्धारित प्रक्रियेनुसार दुरुस्ती करून घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी आपली मतदार नोंदणी अद्ययावत असल्याची खात्री करून घ्यावी.








