
- बेळगाव तालुक्यासह शहरात मांसाहार विक्री तेजीत
- चिकन, मटणला पसंती : मागणीत वाढ
- सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
बेळगाव / प्रतिनिधी
श्रावण महिना अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने मांसाहाराला मागणी वाढली आहे. येत्या शुक्रवारपासून श्रावण महिना सुरु होणार आहे.

या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी चिकन आणि मटणाच्या मागणीत वाढ झाली आहे. ग्रामीण बरोबरच शहरीभागात देखील सकाळपासून चिकन आणि मटणाच्या दुकानांमध्ये मांसाहारप्रेमींनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. श्रावणात मांसाहार वर्ज्य करणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी चिकन, मटण, मासे खरेदीला पसंती दिली आहे.

श्रावणापूर्वीच्या बुधवार आणि गुरुवारी मांसाहाराला अधिक मागणी असणार आहे. याशिवाय खेकडे व अंड्यांनाही मागणी वाढल्याचे दिसत आहे. श्रावणमासाला केवळ दोन दिवसांचा कालावधी असल्याने मांसाहार प्रेमींकडून आताच ताव मारण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे श्रावण तोंडावर आणि खवय्यांची चंगळ, असे चित्र पाहावयास मिळत आहे.

ग्रामीण भागात मटणाचा दर प्रतिकिलो ७२०/- रुपये तर चिकन २३०/- रुपयांपर्यंत आहे. वाढलेल्या दरातही मांसाहाराला चांगली मागणी मिळत असून, विक्रेत्यांना यामुळे मोठा फायदा होत आहे.

