बेळगाव : लोकमान्य ग्रंथालय आणि बुक लव्हर्स क्लब व वरेरकर नाट्य संघातर्फे आयोजित नाट्यदर्पण कार्यक्रम शनिवार, दि. ४ एप्रिल रोजी लोकमान्य ग्रंथालय, वरेरकर नाट्यसंघ येथे यशस्वीपणे सादर करण्यात आला. नाट्यप्रशिक्षण शिबीरातील विद्यार्थ्यांनी अप्रतिम नाट्याविष्कार घडवून प्रेक्षकांचे मन जिंकले.

जागतिक रंगभूमी दिनाच्या दिवशी, म्हणजे दि. २७ मार्च रोजी, वरेरकर नाट्यसंघातर्फे मुलांचे आठ दिवसांचे नाट्य प्रशिक्षण शिबीर सुरू झाले होते. त्याची सांगता ४ एप्रिल रोजी या कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. प्रसिद्ध नाट्यकर्मी नीता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मुले शिकलेल्या नाट्यकौशल्याचे सादरीकरण शिबिरार्थींनी केले.

सध्या सुरु असलेल्या अमेरिका-इराण युद्धावर चपखल भाष्य करणारी “आम्हाला शांतपणे जगु द्या” ही नाटिका सादर करत मुलांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. त्यानंतर त्यांनी साहित्यातील नवरसांचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रेक्षकांना दर्शन घडवले. या कार्यक्रमात नाट्यकर्मी नीता कुलकर्णींचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नाट्यकर्मी आसावरी भोकरे यांनी “नाटकाची कुळकथा” सांगत पाश्चात्य रंगभूमी, भारतीय पारंपरिक नाट्यकला व नाट्यशास्त्राबाबत थोडक्यात माहिती दिली.

यानंतर चिन्मय शेंडे (लखोबा लोखंडे – नाटक : तो मी नव्हेच), श्रेया सव्वाशेरी (मंजुळा – ती फुलराणी), जगदीश कुंटे (पंपुशेट – कवडी चुंबक), प्रिया काळे (संभाजी – रायगडला जेव्हा जाग येते), आणि आसावरी भोकरे (छत्रपती शिवाजी – रायगडला जेव्हा जाग येते) यांनी विविध नाट्याविष्कार सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

स्वागत व प्रास्ताविक जगदीश कुंटे यांनी केले, सुत्रसंचालन विद्या देशपांडे यांनी केले, तर आभार आरती आपटेनी मानले. सुट्टीतील या उपक्रमाचा आनंद उपस्थितांनी भरभरून घेतला आणि आयोजकांचे कौतुक केले.