बेळगाव : मुंबईतील गिरणी कामगारांना मोफत घरे देण्याची घोषणा सरकारने केली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्यापही रखडल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर श्रमिक संघटनेच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून त्यासाठी सीमाभागातील गिरणी कामगार मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले आहेत.

आंदोलनात अधिकाधिक कामगारांनी सहभागी व्हावे यासाठी ७ मार्च रोजी बेळगाव तालुक्यातील बोडकेनहट्टी येथे जागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा आणि कामगारांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यानंतर आज सीमाभागातील चलवेनहट्टी, हंदिगनूर, अगसगे, अतिवाड, कुरीहाळ, कट्टनभावी, म्हाळेनहट्टी, मण्णीकीरे, बेक्कीनकेरे, किटवाड, बंबरगा, केदनूर तसेच चंदगड तालुक्यातील कुर्णी, गुजवडे, कोवाड, सतेवाडी, अडकूर आदी गावांतील गिरणी कामगार आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले.

यावेळी मनोहर हुंदरे, शिवाजी हुंदरे, दरशथ घाटगे, संजीवकुमार, अतुल दिघे तसेच केदारी पाटील आदी उपस्थित होते. आंदोलनाच्या माध्यमातून गिरणी कामगारांना जाहीर केलेली घरे तातडीने मिळावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.