• शालेय शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमध्ये बुधवारी आयोजित प्रतिभा शोध परीक्षा-२०२५ कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर दिला. मंत्री म्हणाले, “विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट शिक्षण मिळवून देशासाठी योगदान द्यावे. प्रतिभा शोध परीक्षा केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित राहणार नाही, तर राज्य पातळीवरही आयोजित केली जाईल, जेणेकरून सर्व सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल.”

या उपक्रमाचे आयोजन जिल्हा पंचायत, शालेय शिक्षण विभाग, बेळगाव आणि चिक्कोडी यांनी संयुक्त विद्यमाने सुवर्णसौधच्या सेंट्रल हॉलमध्ये केले.

आमदार एन. रविकुमार यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात असे सांगितले. तसेच बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करून पालकांचा अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी, असे आवाहन केले.

शिक्षण विभागाच्या उपसंचालिका लीलावती हिरेमठ यांनी सांगितले की, ५२ हजार विद्यार्थ्यांपैकी १२२ विद्यार्थ्यांनी टॅलेंट सर्च चाचणीत उच्च गुण मिळवले आहेत. या चाचणीद्वारे बेळगाव जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये गुणात्मक शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण सुनिश्चित केले जात आहे.

कार्यक्रमात चिक्कोडी आणि बेळगाव जिल्ह्यातील उच्च गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चिक्कोडी सदलगा विधानसभा मतदार गणेश हुक्केरी, बैलहोंगलचे आमदार, कर्नाटक सरकार वित्तीय संस्थेचे अध्यक्ष महांतेश कौजलगी, रमेश बाबू, तसेच शैक्षणिक अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला.