बेळगाव / प्रतिनिधी
१७७ वर्षांचा इतिहास आणि समृद्ध परंपरा लाभलेल्या बेळगाव सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड ॲड. आय. जी. मुचंडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत एकमताने करण्यात आली.
नूतन अध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक नेताजी जाधव यांची निवड करण्यात आली असून रघुनाथ बांडगी यांची उपाध्यक्षपदी, लता पाटील यांची मानद कार्यवाहपदी तर प्रसन्न हेरेकर यांची सहकार्यवाहपदी निवड झाली. या निवडीचा ठराव कार्यकारी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य अभय याळगी यांनी मांडला व त्यास दशरथ सूर्यवंशी यांनी अनुमोदन दिले.
नव्या पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. यावेळी नूतन अध्यक्ष नेताजी जाधव यांनी मावळत्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला आणि त्यांचे आभार मानून त्यांना गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.
या बैठकीस अनंत लाड, सुनिता मोहिते, प्रा. विनोद गायकवाड, शिवाजीराव हंगिरकर, विशाल राऊत, अर्जुन गावडे तसेच व्यवस्थापक विठ्ठल कडगांवकर उपस्थित होते.








