• कठोर प्रशिक्षण पूर्ण करून १,२५० अग्निवीर वायुसेनेत दाखल
  • ‘सारंग’च्या थरारक हवाई कसरती सोहळ्याचे प्रमुख आकर्षण

बेळगाव : सांबरा येथील वायुसेना प्रशिक्षण केंद्रात अग्निवीरांच्या सातव्या तुकडीचा भव्य दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला. तब्बल २२ आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेले १,२५० अग्निवीर भारतीय वायुसेनेत दाखल झाले. यावेळी भारतीय वायुसेनेच्या ‘सारंग’ हेलिकॉप्टर पथकाने सादर केलेल्या थरारक हवाई कसरती सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरल्या.

सांबरा येथील वायुसेना प्रशिक्षण केंद्र परिसर देशभक्तीच्या घोषणांनी आणि उत्साहाने भारावून गेला होता. सातव्या तुकडीतील प्रशिक्षणार्थींनी शिस्तबद्ध आणि दिमाखदार संचलन सादर करत प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप केला. कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अभिजित कुमार यांनी संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. तसेच प्रशिक्षण काळात उत्कृष्ट कामगिरी, नेतृत्वगुण आणि शिस्त दाखवणाऱ्या प्रशिक्षणार्थींना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दीक्षांत संचलनानंतर भारतीय वायुसेनेच्या जागतिक कीर्तीच्या ‘सारंग’ हेलिकॉप्टर प्रदर्शन पथकाने आकाशात रोमांचक कसरती सादर केल्या. जगातील पाच हेलिकॉप्टरचे एकमेव प्रदर्शन पथक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘सारंग’ने स्वदेशी बनावटीच्या एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरच्या साहाय्याने विविध आकर्षक रचना आणि साहसी हवाई प्रयोग सादर करत उपस्थितांची मने जिंकली. आकाशात साकारलेल्या या नेत्रदीपक कसरतींमधून भारतीय वायुसेनेची क्षमता आणि कौशल्य अधोरेखित झाले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एअर कमांडर सूरज शंकर यांनी बदलत्या जागतिक परिस्थितीत आणि आधुनिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर वायुसेना सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असल्याचे सांगितले. अग्निवीरांनीही आपली कौशल्ये सातत्याने विकसित करून देशसेवेसाठी स्वतःला सज्ज ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

कठोर प्रशिक्षणातून तावून-सुलाखून निघालेल्या १,२५० अग्निवीरांनी भारतीय वायुसेनेत प्रवेश करत देशरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या डोळ्यांतील देशप्रेम, संचलनातील शिस्त आणि ‘सारंग’च्या आकाशभेदी कसरतींनी सांबरा येथील हा सोहळा संस्मरणीय ठरला.