बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने हुबळी येथील रेडॉन कॅन्सर सेंटर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग बाल विकास प्रकल्प कार्यालय (सीडीपीओ), बेळगाव अर्बन यांच्या सहकार्याने कर्करोग जागरूकता आणि तपासणी शिबीर (तोंड, स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग) यशस्वीरित्या पार पाडले. बेळगाव येथील वंटमुरी मातृत्व आणि बाल आरोग्य केंद्र येथे आयोजित या शिबिरात सीडीपीओ विभागातील कर्मचारी आणि अंगणवाडी शिक्षक अशा एकूण १६३ जणांची मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली. ज्यामुळे कर्करोगाचे निदान आणि त्याबाबत जागरूकता निर्माण झाली.
या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून डॉ. रमेश दंडगी (तालुका आरोग्य अधिकारी), डॉ. प्रचिती (मुख्य वैद्यकीय अधिकारी, वंटमुरी मातृत्व आणि बाल आरोग्य केंद्र) डॉ. जयनंद डी. (वैद्यकीय अधिकारी), डॉ. शीतल कुलगोड आणि त्यांचे सहकारी, हुबळी येथील रेडॉन कॅन्सर सेंटर, श्री.राममूर्ती (सीडीपीओ, बेळगाव अर्बन) आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
रोटरी क्लबच्या अध्यक्षा आरटीएन रूपाली जनाज यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. शीतल कुलगोड यांनी उपस्थितांना संबोधित करताना, १९ ते ४५ वयोगटातील महिलांसाठी नियमित कर्करोग तपासणी आणि गर्भाशयाच्या कर्करोगाच्या लसीचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ.रमेश दंडगी यांनी कर्करोग प्रतिबंधक धोरणांवर मार्गदर्शन केले. तर सीडीपीओ श्री.राममूर्ती यांनी या आवश्यक आरोग्य उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
अंगणवाडी शिक्षक आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या सदस्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. रेडॉन कॅन्सर सेंटरचे पीआरओ श्री. कोटबागी यांनी उत्तम समन्वय साधला. कार्यक्रमाचे सुरळीत आयोजन आरटीएन उर्मिला गनी (मास्टर ऑफ सेरेमनीज) यांनी केले.