बेळगाव : दिवाळीच्या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने कियान अनाथाश्रमातील मुलांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. क्लबच्या सदस्यांनी अनाथाश्रमाला भेट देऊन तेथील सर्व मुलांना नवीन कपडे भेट दिले.
सणासुदीच्या काळात प्रत्येक मुलाला नवीन कपडे परिधान करण्याचा आणि आनंदाने दिवाळी साजरी करण्याचा अनुभव मिळावा, या भावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. दिवाळी हा प्रकाश, आशा आणि एकतेचा संदेश देणारा सण असून समाजातील वंचित मुलांनाही या आनंदात सहभागी करून घेणे महत्त्वाचे असल्याचे यामागील उद्दिष्ट होते.
या उपक्रमासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षा आशा पाटील यांनी मोठ्या प्रमाणात कपड्यांचे योगदान दिले. तर रोटेरियन रक्षा उपाध्ये यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि समन्वयाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली.
यावेळी क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांनी या सामाजिक उपक्रमासाठी हातभार लावणाऱ्या क्लबच्या सदस्यांसह सर्व हितचिंतक आणि देणगीदारांचे आभार मानले. समाजातील गरजू आणि वंचित घटकांना मदत करणे तसेच मुलांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यापुढेही विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या उपक्रमामुळे कियान अनाथाश्रमातील मुलांची दिवाळी अधिक आनंददायी झाली.








