• रेल्वे स्थानकावर पोलिस, ऑटोचालक आणि गरजूंना छत्र्या, रेनकोट व ब्लँकेटचे वाटप

बेळगाव : रोटरी आंतरराष्ट्रीय वर्ष २०२५–२६ च्या समारोपानिमित्त रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे आयोजित करण्यात आलेला ‘मिडनाईट मान्सून रिलिफ’ हा मानवतावादी सेवा उपक्रम उत्साहात पार पडला. पावसाळ्यात प्रतिकूल परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या तसेच गरजू नागरिकांना उब, संरक्षण आणि आधार मिळावा, या उद्देशाने मध्यरात्री बेळगाव रेल्वे स्थानक परिसरात विविध जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

रोटेरियन अॅड. विजयलक्ष्मी मन्निकेरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि रोटेरियन कावेरी करूर यांच्या सचिवपदाच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमांतर्गत सार्वजनिक प्रतिमा अभियानाचा भाग म्हणून रेल्वे स्थानकावरील पोलिस अधिकाऱ्यांना दर्पण छत्र्यांचे वितरण करण्यात आले. तसेच मुसळधार पावसातही सेवा बजावणाऱ्या ऑटोचालकांना रेनकोट, तर चहा विक्रेते, पार्किंग कर्मचारी आणि इतर गरजू नागरिकांना ब्लँकेट देऊन त्यांना मदतीचा हात देण्यात आला.

यावेळी बोलताना अध्यक्षा रोटेरियन ॲड. विजयलक्ष्मी मन्निकेरी म्हणाल्या, “जेव्हा सेवा सर्वाधिक गरज असलेल्या व्यक्तींपर्यंत योग्य वेळी पोहोचते, तेव्हा तिचे महत्त्व अधिक वाढते. या मान्सून रिलिफ उपक्रमाद्वारे कठीण परिस्थितीत समाजसेवा करणाऱ्यांना उब, संरक्षण आणि आशा देण्याचा आमचा प्रयत्न होता. दर्पणच्या करुणा, एकता आणि सेवाभावाचे हे जिवंत उदाहरण आहे.”

या उपक्रमासाठी प्रेरणा दिल्याबद्दल रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे जिल्हा गव्हर्नर रोटेरियन इर. अरुण डी. भंडारे आणि फर्स्ट लेडी माधवी भंडारे यांचे आभार मानण्यात आले. तसेच असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन उदय जोशी यांच्या मार्गदर्शनाबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चार्टर अध्यक्षा रोटेरियन शीतल चिलामी, कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर रोटेरियन सविता वेसणे, श्री दीपक वेसणे, खजिनदार रोटेरियन सुरेखा मुम्मिगट्टी तसेच सर्व दर्पणाईट्स यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. ‘Service Above Self’ या रोटरीच्या ब्रीदवाक्याला साजेसा हा उपक्रम ठरत, रोटरी वर्षाचा सेवाभावी आणि संस्मरणीय समारोप करण्यात आला.