बेळगाव / प्रतिनिधी

रिक्षाच्या भाड्याच्या क्षुल्लक कारणावरून रिक्षाचालक आणि दोन महिला प्रवाशांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि महिलांनी रिक्षाचालकाला मारहाण केली. बेळगाव शहरातील डॉ. आंबेडकर रस्त्यावरील जिल्हा रुग्णालयासमोर ही धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार आज दुपारी गांधीनगरला जाण्यासाठी आलेल्या दोन महिला प्रवाशांनी रिक्षाचालक मोहम्मद अन्वर मकानदार यांच्याशी भाड्यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. रिक्षाचालकाने १५० रुपये भाडे सांगितले असता, महिलांनी नेहमीप्रमाणे ७०-८० रुपये देण्याची तयारी दर्शवली. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

या वादानंतर संतप्त झालेल्या महिलांनी रिक्षाचालकाला शिवीगाळ करत मारहाण केली, असा आरोप रिक्षाचालक मोहम्मद अन्वर मकानदार यांनी केला आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले असून, रिक्षाची काचही फोडण्यात आली आहे. जखमी रिक्षाचालकाला उपचारासाठी बेळगावातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुसरीकडे, प्रवाशांपैकी एक असलेल्या अल्मास यांनी रिक्षाचालकावर आरोप केला आहे. रिक्षाचालकाने भाड्यावरून वाद घातल्यानंतर आपल्याला मारहाण केली आणि रिक्षाचे भाडे जास्त मागितले. प्रवाशांसोबत गैरवर्तन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवून घेतले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.