- राखी खरेदीसाठी बहिणींची बाजारात गर्दी
- विविध राख्यांची पडतेय भुरळ
बेळगाव / प्रतिनिधी
बहीण – भावाचे प्रेमळ नाते दृढ करणारा रक्षाबंधन हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा शनिवार दि. ९ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या या सणासाठी बेळगाव बाजारपेठ विविध राख्यांनी फुलली आहे. बाजारात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. यावर्षी अनेक नव्या ट्रेंडमध्ये राख्या पाहायला मिळत आहेत.

बेळगाव मधील होलसेल बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांगुळ गल्लीसह मारुती गल्ली, कडोलकर गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली आदि ठिकाणी राख्यांचे भव्य स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये विविध आकार, डिझाईन, रंग व थीम वापरून बनवलेल्या राख्या बहिणींना भुरळ घालत आहेत.

काही दिवसांपासून शहर व उपनगरांत पावसाने थैमान घातले होते. पण आता पावसाने उसंत घेतल्याने भाऊरायाच्या पसंतीची राखी घेण्यासाठी बहिणींची बाजारात गर्दी होत आहे. तर दुसरीकडे भाऊ देखील आपल्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करताना दिसत आहेत. वाढत्या महागाईमुळे राख्यांच्या किमतीत वाढ झाली असली तरी राख्या खरेदी करण्यासाठी महिला वर्गाचा उत्साह कायम असल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले असून बाजारपेठेत सर्वत्रच उत्साहाचे वातावरण आहे.