• तरीही डेड स्टॉकमधूनच पाणीउपसा
  • गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २४ फूट कमी पाणीसाठा
  • शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता कायम

बेळगाव : गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत एका फुटाची वाढ झाली असली, तरी जलाशय अद्यापही डेड स्टॉकच्या पातळीखाली असल्याने शहरासाठी डेड स्टॉकमधूनच पाणीउपसा सुरू आहे.

गतवर्षी जुलैच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसामुळे राकसकोप जलाशय वेगाने भरू लागला होता. मात्र यंदा मान्सून उशिराने सक्रिय झाल्याने जलाशयातील पाणीसाठा चिंताजनक स्थितीत आहे. गतवर्षी याच दिवशी जलाशयाची पाणीपातळी २,४७१.७० फूट होती, तर यंदा ती केवळ २,४४७ फूट इतकी नोंदविण्यात आली आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २४ फूट कमी पाणीसाठा जलाशयात आहे.

गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे पाणीपातळीत काहीशी वाढ झाली असली, तरी ती अद्याप डेड स्टॉकच्या वर पोहोचलेली नाही. त्यामुळे शहराचा नियमित पाणीपुरवठा सध्या डेड स्टॉकमधील पाण्यावरच अवलंबून आहे.

हवामान खात्याने येत्या काही दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, राकसकोप जलाशयाच्या पाणीसाठ्यात लवकरच लक्षणीय वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र तोपर्यंत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.