बेळगाव / प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून सातत्याने संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आता शहरात सर्वत्र पाणी पाणी झाले आहे त्याचबरोबर शहराची तहान भागवणाऱ्या राकसकोप जलाशयात पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला आहे त्यामुळे धरणाची दारे देखील उघडण्यात आली आहेत. त्यामुळे राकसकोप भरले आणि पाणीटंचाईचे संकट दूर झाले अशी भावना व्यक्त होत आहे.
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप पाणलोट क्षेत्रातील जलाशयाला मिळणाऱ्या नदी व नाल्यातून पाणी दुथडी भरुन वाहू लागले आहे. पाण्याचा प्रचंड प्रवाह जलाशयाला येऊन मिळत असल्याने पाणीपातळीत वाढ झाली. बुधवारी सकाळी पाणीपातळी २४७१.७० फुटावर गेल्यानंतर सायंकाळी ही पातळी २४७२.५० फुटावर गेली. राकोसकोप जलाशय आता काठोकाठच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असून ते पूर्ण भरण्यासाठी केवळ अडीच फुट पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर जलाशय व्यवस्थापनाने संभाव्य धोका टाळण्यासाठी बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजता जलाशयाच्या वेस्टवेअरच्या सहा दवाजांपैकी दोन क्रमांकाचा दरवाजा दोन इंचाने उचलण्यात आला आहे. जलाशयात येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेत अन्य दरवाजेही उचलण्यात येणार आहेत. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याची पाणीपातळी ही २४७५ फुट आहे. येत्या दोन दिवसांत ती पूर्ण होईल. बुधवारी सकाळी ४१.५ मि.मी. पावसाची नोंद झाली तर यावर्षीचा एकूण पाऊस १२६.९ मि.मी. झाला आहे. त्यापैकी १५ जून पासून ३० जूनपर्यंतच्या १५ दिवसांत ९०० मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत २० फुट पाणीपातळीत वाढ झाली आहे.
मागील वर्षी याच दिवशी पाणीपातळी ही निच्चांकी २४५२.८० फुटावरच स्थिर होती. पाऊस ही ४२९ मि.मी. इतका कमी होता. मागील वर्षी संपूर्ण जून महिन्यात २४८ मि.मी. पाऊस झाला होता. जलाशयाचा दरवाजा उचलण्यात आल्याने पाणी मार्कंडेय नदीतून प्रवाहित झाले आहे. पुढील काळात जलाशयातील येणाऱ्या प्रवाहाची पाहणी करुन दरवाजे उचलण्यात येणार असल्याने मार्कंडेय नदी पात्राशेजारील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.