- कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रशासनाला निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
सौंदत्ती येथे दरवर्षी होणारी श्री रेणुकादेवी यात्रा यंदा १ ते ५ डिसेंबर दरम्यान पार पडणार असून, या काळात महाराष्ट्रातील हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे यात्रेदरम्यान भाविकांच्या सोयी – सुविधांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेने बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट देऊन निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, यात्रा काळात महाराष्ट्र आणि कोल्हापूर येथून येणाऱ्या बसेस व मालवाहू वाहनांना डोंगरावर प्रवेशाची परवानगी द्यावी. पार्किंगची योग्य व्यवस्था, तसेच पिण्याच्या पाण्याची, वीज, स्वच्छता आणि पथदीपांची सोय करावी. देवीच्या दर्शनासाठी मंदिराचे सर्व दरवाजे खुले ठेवावेत, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि महिला पोलीस बंदोबस्त ठेवावा. त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी भाषेतील माहिती फलक लावण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने नमूद केले की, पौर्णिमा यात्रेला सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक सौंदत्ती डोंगरावर येतात. त्यामुळे गर्दी नियंत्रण, चोरीच्या घटनांना आळा आणि सुरक्षितता यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी.
निवेदन स्वीकारताना जिल्हाधिकारी कार्यालयाचे शिरस्तेदार श्रीशैल प्रगती यांनी सांगितले की, यात्रेच्या पार्श्वभूमीवर लवकरच बैठक घेण्यात येईल आणि संघटनेच्या मागण्यांवर चर्चा केली जाईल.
तसेच पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, यात्रेकरूंना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक सोयीसुविधा पुरवल्या जातील आणि वाहतुकीसह सुरक्षेची प्रभावी व्यवस्था करण्यात येईल.
नंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सौंदत्ती रेणुका मंदिर प्राधिकरणाच्या अधिकारी रत्नमाला यांनाही निवेदन सादर केले. यावेळी अध्यक्ष अच्युत साळोखे, कार्याध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष सरदार जाधव, सरचिटणीस तानाजी सावंत, गजानन विभुते, मोहन साळोखे, आनंदराव पाटील, युवराज मुळे, दयानंद घबाडे, लता सूर्यवंशी, शालिनी सरनाईक यांसह संघटनेचे अनेक सदस्य उपस्थित होते.








