• पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

बेळगाव / प्रतिनिधी

गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाव्य संकटावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पंचायत कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी पार पडली.

यावेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे अधिकारी तसेच संबंधित यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील पूर प्रवण भागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कोणत्याही ठिकाणी पूरस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदत आणि बचाव कार्य करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नदी नाल्यांच्या नियमित देखभालीसह पूर नियंत्रणासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले. जिल्हा प्रशासनाने संभाव्य पूरग्रस्त भागामध्ये आपत्कालीन मदत केंद्रांची पूर्वतयारी, बोटसेवा, वैद्यकीय पथके आणि आवश्यक मदत साहित्य सज्ज ठेवण्याचे नियोजन केल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.