- पहिल्या टप्प्यात २३० किमी रस्त्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू
बेळगाव : राज्य सरकारच्या ‘प्रगतीपथ’ योजनेंतर्गत बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४८१.१४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा विकास करण्यात येणार असून, यासाठी सुमारे ३४९.७४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्ह्यातील सर्व १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने ‘प्रगतीपथ’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यभरात ५,१९० कोटी रुपयांच्या खर्चातून ७,११० किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
बेळगाव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या रस्ते विकास प्रकल्पांतर्गत ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती, नव्या संपर्क मार्गांची निर्मिती तसेच वाहतुकीसाठी दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. हा प्रकल्प ७० टक्के कर्ज व ३० टक्के राज्य सरकारच्या अनुदानाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
रस्ते बांधकामानंतर पुढील पाच वर्षे संबंधित रस्त्यांची देखभाल करण्याची जबाबदारीही कंत्राटदारांवर राहणार आहे. या संपूर्ण प्रकल्पावर कर्नाटक ग्रामीण रस्ते विकास महामंडळ देखरेख ठेवणार असून, मतदारसंघनिहाय पॅकेज पद्धतीने कामे हाती घेतली जाणार आहेत.
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील २३०.५४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांसाठी १६३.३६ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला असून, १५ मे रोजी निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाला गती मिळणार असल्याचे चित्र आहे.








