- २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
बेळगाव : वीज जोडणी कामाचे अंदाजपत्रक तयार करून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना हेस्कॉमचा शाखा अधिकारी लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकला. मुडलगी तालुक्यातील कल्लोळी येथील हेस्कॉम शाखा अधिकारी मारुती मेटी याला बेळगाव लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
तुक्कानट्टी गावातील रहिवासी आणि वर्ग-१ विद्युत कंत्राटदार प्रीती बागी यांच्या वतीने तीन ठिकाणांची पाहणी करून अंदाजपत्रक तयार करण्यासाठी मारुती मेटी याने २५ हजार रुपयांची मागणी केली होती. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी बेळगाव लोकायुक्त पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लोकायुक्त पोलीस अधीक्षक प्रसन्न देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संगमनाथ एच. होसमानी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने सापळा रचला. त्यामध्ये आरोपी अधिकारी लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आला.
लोकायुक्त पोलिसांनी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.








