बेळगाव : माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांना उत्कृष्ट तपास कार्याबद्दल प्रतिष्ठेच्या ‘केंद्रीय केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदका’ने सन्मानित करण्यात आले आहे. गुन्ह्यांचा तपास करताना पुराव्यांचे संकलन, तपासातील व्यावसायिक कौशल्य आणि नागरिकांशी सौजन्यपूर्ण वागणूक या बाबींची दखल घेत त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या सन्मानामुळे बेळगाव शहर पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गड्डेकर यांनी आपल्या सेवाकाळात अनेक महत्त्वपूर्ण गुन्ह्यांचा तपास केला आहे. कोट्यवधी रुपयांच्या ठेव फसवणूक प्रकरणात गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली होती. या प्रकरणाच्या तपासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न केले.
तसेच बेळगावमधील लक्ष्मण दड्डी टोळीशी संबंधित हत्या प्रकरणाच्या तपासात त्यांनी महत्त्वाचे पुरावे संकलित केले. या पुराव्यांच्या आधारे आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध होण्यास मदत झाली. या प्रकरणात न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यांच्या तपासातील या कामगिरीचीही विशेष दखल घेण्यात आली.
केवळ गुन्ह्यांचा तपास आणि आरोपींना अटक करण्यापुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणे, त्यांच्याशी सौजन्याने वागणे आणि पोलीस दलाविषयी विश्वास निर्माण करण्यावरही गड्डेकर भर देतात. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचे सहकारी आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. आता केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट तपास पदकाची भर पडल्याने त्यांच्या पोलीस सेवेतील कारकिर्दीला आणखी एक महत्त्वाचा सन्मान मिळाला आहे.







