बेळगाव : चव्हाट गल्लीत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक गंभीर हालचालींना सामोरे जात आहेत. अनेक दिवसांचा तुटवडा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त महिलांनी आज रिकामे हंडे घेऊन रास्तारोको आंदोलन केले. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, तातडीने समस्या सोडवली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढणार आहेत.

चव्हाट गल्लीतील पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून विस्कळीत असून, नागरिकांना पाण्यासाठी मैलोन्मैल करावी लागत आहे. पाईपलाईनचे काम निकृष्ट असल्याने अनेक नळांना पाणी पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. मिळत असलेले पाणीही ड्रेनेजच्या दूषित पाण्यासोबत मिसळत असल्याने आरोग्यावरील धोका वाढला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यात कीडे आढळल्याचेही महिलांनी सांगितले. “अधिकारी वॉर्डात येतील, जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया चव्हाट गल्लीतील महिलांची होती.

२४ तास पाणी योजनेसाठी रस्ते खोदून पाईपलाईन टाकण्यात आली, पण व्यवस्थापन पूर्ण कोलमडले असल्याने लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दूषित पाण्यामुळे लहान मुले आणि वृद्धांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महिलांनी महापालिका आयुक्तांकडून या मूलभूत समस्येवर तातडीने उत्तर देण्याची मागणी केली आहे.