बेळगाव / प्रतिनिधी

टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेटवरील ओव्हर ब्रिजच्या दुर्दशा झालेल्या रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती केली जाईल, असे ठोस आश्वासन स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापौर मंगेश पवार यांनी दिल्यामुळे सदर रस्ता दुरुस्तीसाठी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली आजपासून छेडण्यात येणारे उपोषण आंदोलन सुरू होण्यापूर्वीच मागे घेण्यात आले आहे.

टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजच्या रस्त्याची अलीकडे डांबरीकरण उखडून व मोठे धोकादायक खाचखळगे पडून वाताहात झाली आहे. अपघात प्रवण बनलेल्या या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी वारंवार मागणी करून ही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यासाठी मोठा फलक वगैरे उभारून ब्रिजच्या रस्त्यावर उपोषणाला बसण्याची जय्यत तयारीही करण्यात आली होती. तथापि या आंदोलनाची दखल घेत आज गुरुवारी सकाळी महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांच्यासह शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी आंदोलन स्थळी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.