• गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटला बंदी
  • डॉल्बीचा आवाज मर्यादित ठेवण्याचे आवाहन

बेळगाव : गणेशोत्सव हा आनंद, उत्साह आणि एकोप्याचा सण आहे. नागरिकांनी उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा, त्यांच्या आनंदावर कोणतेही बंधन आणण्याची पोलिसांची इच्छा नाही. मात्र, उत्सवाचा आनंद अबाधित ठेवतानाच कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि आनंदात साजरा करावा, असे आवाहन बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी केले.

गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पोलीस आयुक्त निकम यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती दिली. गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस प्रशासन गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी कार्यरत असून, विविध गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी आवश्यक नियम व मार्गदर्शक सूचनांची माहिती मंडळांना देण्यात आली आहे.

मंडळांनी आपल्या सूचना वेळेत प्रशासनासमोर मांडाव्यात. ऐनवेळी नवीन सूचना किंवा मागण्या करून त्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न करू नये, असेही निकम यांनी स्पष्ट केले. उत्सवाच्या नियोजनात प्रशासन आणि मंडळांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

  • विसर्जन मिरवणुकीतील चढाओढ टाळा

गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाढत्या चढाओढीबाबतही पोलीस आयुक्तांनी मंडळांचे लक्ष वेधले. काही वर्षांपूर्वी मिरवणुकीत पहिला गणपती कोणाचा, यावरून चढाओढ होत होती. आता विसर्जन मिरवणुकीत शेवटची मूर्ती कुणाची, यावरून स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे मिरवणुकीचा कालावधी वाढत असून, गेल्या वर्षी विसर्जन मिरवणूक तब्बल ३६ तास सुरू होती, असे त्यांनी नमूद केले.

मिरवणुकीतील डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे वृद्ध, लहान मुले तसेच आजारी व्यक्तींना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे डॉल्बीचा आवाज मर्यादित ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

  • लेझर लाईटचा वापर करू नका

विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या लेझर लाईटबाबत पोलीस आयुक्तांनी विशेष सूचना दिल्या. लेझर लाईटच्या तीव्र प्रकाशामुळे डोळ्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता असून, त्याचा वापर टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर करूच नका, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

  • आगमन सोहळे उशिरा करू नका

गणेशमूर्ती आगमन सोहळ्यांदरम्यान होणाऱ्या गर्दी आणि सुरक्षेच्या प्रश्नांकडेही त्यांनी लक्ष वेधले. मुंबईत श्रीमूर्ती आगमनाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचा संदर्भ देत, अशा घटनांपासून धडा घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशमूर्ती आगमन सोहळे रात्री उशिरापर्यंत करू नयेत, अशी सूचनाही त्यांनी मंडळांना केली.

गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांना २४ तास रात्रंदिवस सतर्क राहून काम करावे लागते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज असले तरी उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. सर्वांच्या सहकार्यानेच गणेशोत्सव आनंदात, उत्साहात आणि शांततेत साजरा होऊ शकतो, असा विश्वास पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी व्यक्त केला.